जिरेमाळी समाज सेवा संघाची स्थापना


समाज बंधु आणि भगिनी,

जिरेमाळी समाज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अनेक भागात व नोकरी/व्यवसायाच्या निमित्ताने विदेशातही विसावलेला आहे. उपलब्ध आकडेवारी नुसार महाराष्ट्र राज्यात मराठा समाजानंतर सर्व जातीय माळी समाज दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यात जिरेमाळी समाज देखील फार मोठया प्रमाणावर राज्यात विविध ठिकाणी स्थायिक झालेला आहे. परंतु एकमेकांच्या संपर्काअभावी या समाज बांधवांची नव्हे ते रहात असलेल्या अनेक गावांची देखील माहिती आत्ता पर्यंत एकमेकांना नव्हती. जिरेमाळी समाजाची काही मंडळे क्षेत्रीय स्वरुपात आता व या पुर्वी देखील अस्तित्वात होती. ही मडंळे त्या त्या गावापुरती, शहरापुरती, फार तर जिल्हयापुरती कार्यरत असतात. परंतु राज्यातील व राज्या बाहेरील सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठी किमान राज्यस्तरावरील संस्था असणे आवश्यक होते. अशी संस्था अस्तित्वात नसणे ही जिरेमाळी समाजाची एक शोकांतीकाच म्हणावी लागेल. त्यामुळेच राज्यातील समाज बांधव एकत्र येऊ शकले नाहीत, ही वस्तूस्थिती आहे.

उशीरा का होईना, जिरेमाळी समाजाच्या एकत्रीकरणासाठी, विविध ठिकाणी रहात असलेल्या समाजबांधवांना एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी व त्याच्या उन्नतीसाठी दिनांक २३ ऑगस्ट २००७ रोजी जिरेमाळी समाज सेवा संघ ही राज्यस्तरीय संस्था स्थापन करण्याचे ऎतिहासिक पाऊल आहे.

आपल्या या राज्यस्तरीय जिरेमाळी समाज सेवा संघाची स्थापना प्रामुख्याने मुंबईमध्ये सन एप्रिल १९९८ मध्ये स्थापना झालेल्या सगरवंशीय जिरेमाळी समाज मंडळाच्या विविध कार्यक्रमाच्या वेळी झालेल्या बैठकातील तसेच औरंगाबाद, नागपूर, नाशिक येथील बैठकांतील विचारमंथनातुन तसेच सिन्नर येथील राज्यव्यापी अधिवेशनातून झाली.

सगरवंशीय जिरेमाळी समाज मंडळ मुंबई यांच्या प्रयत्नातुन सन २००३, २००४, २००७ मध्ये मुंबई येथे व २००५ मध्ये सिन्नर येथे राज्यव्यापी अधिवेशन घेण्यात आली. य अधिवेशनांतील अनेक समाजबांधवांच्या विचारमंथनातुन राज्यव्यापी संघटना स्थापन्याची मुहुर्तमेढ रोवली गेली. मुंबई, नाशिक, औरंगाबाद, धुळे, नागपूर, सिन्नर इत्यादी ठिकाणी घेण्यात आलेल्या बैठकांना राज्यभरातील समाज बांधवांनी उपस्थित राहून राज्यव्यापी संघटनेच्या संकल्पनेस मुर्त स्वरूप देण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून दिनांक १९ ऑगस्ट २००६ रोजी औरंगाबाद येथे बोलविण्यात आलेल्या बैठकीत राज्यातील समाज प्रतिनिधींच्या समंतीने राज्यस्तरीय संस्था अनौपचारीकरित्या स्थापन करुन तात्पूरती कार्यकारणी निवडण्यात आली. या समितीने वर्षभर सर्वकष विचार विनिमय व सर्व प्रशासकीय बाबी पुर्ण करुन दिनांक २३ ऑगस्ट २००७ रोजी राज्यस्तरीय जिरेमाळी समाज सेवा संघाची मा. धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्या कार्यालयात नोंदणी करुन विधीवत स्थापना केली व जिरेमाळी समाजाचे खऱ्या अर्थाने पहिले राज्यव्यापी व्यासपीठ उदयास आले.

संस्थेची उद्दिष्ठे - सामाजीक -
१) राज्यातील व राज्याबाहेरील समाज बांधवांना एकत्रित आणणे.
२) राज्यात ठिकठिकाणी संस्थेच्या शाखा स्थापन करणे.
३) समाजाचे मुखपत्र चालविणे, समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणे.
४) ठिकठिकाणी समाजाच्या वास्तु/समाजमंदिर उभारणे, विविध समाजोपयोगी व कल्याणकरी व हितोपयोगी कार्यक्रम राबविणे.

ब) शैक्षणिक :
१) शैक्षणिक संस्था स्थापन करुन त्या चालविणे.
२) समाजातील गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक बाबींसाठी मदत करणे.
३) वसतीगहे, वाचनालये, व्यायामशाळ स्थापन करुन चालविणे.
४) शिक्षणासाठी समाजातील होतकरु विद्यार्थ्यांना मदत करणे.
५) गरजु रुग्ण समाजबांधवांना आर्थिक मदत करणे.

क) सांस्कॄतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन समाज प्रबोधन, समाजोन्नतीचे कार्य करणे.

ड) आर्थिक :
१) समाज बांधवांकडून तसेच इतर दानशुर व्यक्तींकडून देणग्या स्विकारुन समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक, वैद्यकीय व इतर मदत करणे.
२) निधी उपलब्ध करण्यासाठी विविध (चॅरीटी) उपक्रम हाती घेणे. पतपेढी इ. संस्था स्थापन करुन चालविणे.

राज्यस्तरीय कार्यकारिणी सदस्य तसेच जिल्हाशाखा पदाधिकरीची निवड संस्थेने घेतलेल्या बैठका - औरंगाबाद, मुबंई, नागपुर, नाशिक, पिंपळनेर, धुळे इ.